19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवारांना सोबत घेणे ही भाजपची चूक

अजित पवारांना सोबत घेणे ही भाजपची चूक

पुणे – लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आला नाही. त्यासाठी ३२ जागा कमी पडल्या. या पराभवासाठी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेपुढे सामान्य भाजप कार्यकर्त्यांचा, पाठीराख्यांचा आवाज भाजपने ऐकला नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ मधील लेखातून म्हटले आहे. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने चूक केली असेही या लेखात म्हटले आहे.

लोकसभा निकालाचे विश्लेषण अजूनही सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने ‘चारशे पार’चा नारा दिला होता. वास्तविक त्यांना बहुमतासाठीचा आकडाही स्वबळावर गाठता आला नाही. संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकात ‘मोदी ३.०: कन्व्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन’ लेखातून भाजप नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. या लेखात म्हटले आहे की, भाजपच्या पराभवाला त्यांनी केलेले नको असलेले राजकारण कारणीभूत ठरले आहे.

त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले. महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचे बहुमत असलेले सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती, असा सवाल या लेखातून रतन शारदा यांनी केला आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे एवढी वर्षे काँग्रेसी विचारधारेविरोधात लढलेल्या भाजपसमर्थकांना आता आपण कोणाला मते द्यायची असा प्रश्न पडला आणि भाजपने आपली किंमत करून घेतली, अशी खरमरीत टीका रतन शारदा यांनी केली आहे.
भाजपने महाराष्ट्रात बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेतल्याचा राग भाजपच्या मतदारांना होता, हेच या लेखातून रतन शारदा यांनी अधोरेखित केले आहे. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक हे भाजपचे काम करणारे कार्यकर्ते नाहीत, त्यांची मदत हवी असेल तर भाजपने तशी मागणी करायला पाहिजे होती, असेही खडे बोल त्यांनी भाजपला सुनावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR