21.2 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावे

अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावे

बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिसांनी अजूनही काही आरोपींना अटक केलेली नाही. दरम्यान, आता यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घ्यावे अशी मागणी केली.

खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करू, देशमुख यांना न्याय देऊ असे सांगितले आहे. पण, अजूनही असे काही होत असल्याचे दिसत नाही. काही दिवस याचा तपास पोलिस करत होते, यानंतर सीआयडीकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. पोलिस यंत्रणेला हे तिन्ही गुन्हे कुठेतरी लिंक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. यामुळे या गुन्ह्याच्या पाठिमागच्या मास्टरमाईंडला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली.

कोणी सीआयडीची तर कोणी एसआयटीची मागणी करत आहे. पण मी पहिल्या दिवसापासून सीबीआयची मागणी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या पाच वर्षांपासून वेगळ्या ट्रॅकवर गेला आहे. याच्यात कोण आहे ते तपासले पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत आहे.

या गुन्ह्याच्या संदर्भात मी कोणाचे नाव घेण्यापेक्षा लोकांना सर्व गोष्टी माहीत आहेत. बीड जिल्ह्यात ज्या घटना घडल्या आहेत, त्यांचा ऊहापोह झालेला नाही, दमानिया यांनीही व्हीडीओ शेअर केले आहेत. याचा तपास केला पाहिजे. या गुन्हेगारांना कोण पाठबळ देत आहे त्याचा तपास केला पाहिजे. सीडीआर काढला तर याची सर्व माहिती मिळेल, असेही बजरंग सोनवणे म्हणाले.

याआधीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, त्यामुळे अंधारात कोण काय काय करतंय हे जाणून घ्यायचे असेल तर अजितदादांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावे अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR