20.2 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवार गटाकडून जीवे मारण्याची धमकी

अजित पवार गटाकडून जीवे मारण्याची धमकी

हर्षवर्धन पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र महायुतीत वाद पेटणार

इंदापूर : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती आता मजबूत झाल्याचे दावे करतानाच आता अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. या आधी पुरंदरचे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी विधानसभेचे ठरले तरच मदत करणार, असे म्हटले होते. आता इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार गटाविरोधात थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाठवत आपल्याला जीवे मारण्याची धमकी येत असल्याचे म्हटले आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली. या पत्रावरून अजित पवार गटाविरोधात हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटाची वाट बिकट होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्याने पवार कुटुंबात दोन गट पडले असून, अजित पवार यांनी आता आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवून शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी चंग बांधला आहे. मात्र, शरद पवार यांनीही त्यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांची वाट बिकट बनते की काय, असे वाटत असतानाच आता महायुतीतील मित्रपक्षांनीच त्यांना रोखण्यासाठी पाऊल उचलायला सुरुवात केल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघात चित्र आहे.

भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक आहेत. मात्र, महायुतीत ते आता अजित पवार यांना साथ देणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, लोकसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. कारण खुद्द हर्षवर्धन पाटील यांनीच आता अजित पवार गटाविरोधात आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांचा रोख थेट अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांच्यावर असून या लेटरबॉम्बने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR