पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बंद दाराआड अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. या चर्चेमुळे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये काय खलबतं झाली याची चर्चा रंगली आहे. सदर बैठकीमुळे पुन्हा एकदा जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांबरोबर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
याच संदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर आणि अजित पवारांच्या पक्षाचे अमोल मिटकरींनी जयंत पाटील अजित पवारांसोबत येतील असे मत व्यक्त केले आहे. जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली तर पक्षफुटीनंतरचा हा शरद पवारांना दुसरा सर्वांत मोठा धक्का ठरेल अशी चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे तासभर आधीच ‘व्हीएसआय’ला पोहोचले. अजित पवार संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात बसले. त्याचवेळी जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीला आले. दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली. जयंत पाटील अजित पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर ते वेगळ्या केबिनमध्ये जाऊन बसले. भेटीनंतर नियामक मंडळ बैठक सुरू होण्याआधी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील तिघेही वेगवेगळा केबिनमध्ये बसल्याचे दिसून आले. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, दिलीप देशमुख, जयप्रकाश दांडेगावकर, विवेक कोल्हे उपस्थित आहेत.