बारामती : देशाचे लक्ष महाराष्ट्रातील एका जागेकडे लागले आहे. तो मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामतीत एकाच कुटुंबात लढत होणार आहे. ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि सून सुनेत्रा पवार यांच्यात मुकाबला होणार आहे. या निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्यास दावा कायम राहावा म्हणून अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज छाननीत अजित दादांचाच अर्ज बाद झाला आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजित पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित पवार यांनी डमी उमेदवारी अर्ज भरला होता. अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाकडून उमेदवार असावा म्हणून डमी अर्ज भरण्याची परंपरा आहे. त्यानुसार अजितदादांनीही डमी अर्ज भरला होता. मात्र, अर्ज छाननीत अजित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे. तर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर
दरम्यान, सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर शरद पवार गटाकडून डमी अर्ज भरलेल्या सचिन दोडकेंचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दोडके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाने आज अर्ज छाननीसाठी अनेकांना बोलावले होते. एकाच पक्षाचे दोन अर्ज असल्यामुळे एकाच उमेदवाराचा अर्ज मंजूर करण्यात आला. तर डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचा अर्ज वैध ठरल्याने आता नणंद-भावजयीमध्ये थेट लढत होणार आहे.
शरद पवार रिंगणात
दरम्यान, ‘बघतोय रिक्षावाला’ संघटना पुरस्कृत उभे असलेले अपक्ष उमेदवार, रिक्षाचालक शरद राम पवार यांचा बारामती लोकसभेसाठीचा अर्ज मंजूर झाला आहे. सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे हा अर्ज वैध झाला असून प्रशासनाकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत पवार घराण्यात निवडणूक होत असतानाच शरद पवार नावाचा व्यक्ती मैदानात उतरल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.