नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बुधवारी पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. विनीत सुरी हे अडवाणी यांच्यावर उपचार करीत आहेत. सध्या अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. सुरी यांनी सांगितले. दरम्यान, अडवाणी यांच्या कार्यालयाने त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी २६ जून रोजी लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुस-याच दिवशी त्यांना सुटी देण्यात आली होती. परंतु पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी रात्र ९ च्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांना नेमका काय त्रास होत आहे, हे कळू शकले नाही. या अगोदर त्यांना युरिनशी संबंधित इन्फेक्शनमुळे त्यांना युरॉलॉजी विभागात डॉ. अमलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर तात्काळ उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले होते. परंतु आठवडाही उलटत नाही, तोच पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.