लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा ३०० ते ५०० दर कमी मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळत आहेत. हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी घेऊन येणा-या शेतक-यांचा प्रतिसाद पाहता नाफेडने शेतक-यांना नोंदणीसाठी दि. ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आज पर्यंत नाफेडच्या २३ हमीभाव खरेदी केंद्रावर ११ हजार ३२३ शेतक-यांचे २ लाख ४४ हजार ६९६ क्विंटल सोयाबीन खरेदी केले आहे. या शेतक-यांना शासनाच्या हमीभावाचा लाभ घेतला आहे.
लातूर जिल्हयात यावर्षी ५ लाख ९१ हजार ६६५ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. या मध्ये ४ लाख ८७ हजार ६६३ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला होता. गेल्यावर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे मोठया प्रमाणात सोयाबीन भिजून शेतक-यांच्या डोळया देखत सोयाबीनचे झाले. राहिलेले सोयाबीन शेतकरी आडत बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सोयाबीनला शासनाने ५ हजार ३२८ रूपये हमीभाव जाहिर केला असला तरी आडत बाजारात सोयाबीनला ५ हजार रूपयांच्या जवळपास भाव मिळत आहे. यामुळे शेतक-यांच्या सोयाबीनला क्विंटल मागे ३०० ते ५०० रूपयांचा जवळपास फटका बसत आहे. सदर बाब पाहता शेतकरी शासनाने सुरू केलेल्या हमीभाव खरेदी केंद्राकडे धाव घेत आहेत.
जिल्हयात नाफेडकडून २३ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. या खरेदी केंद्रावर आजपर्यंत ३५ हजार ४४४ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २४ हजार ३५५ शेतक-यांना सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येण्यासाठी एसएमएस पाठवण्यात आले होते. जिल्हयातील ११ हजार ३२३ शेतक-यांचे २ लाख ४४ हजार ६९६ क्विंटल सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी केले आहे.

