31 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeराष्ट्रीयअतिरेक्यांविरुद्ध धडक मोहीम

अतिरेक्यांविरुद्ध धडक मोहीम

घरांची झडती, १७५ संशयित ताब्यात, दहशतवाद्यांचे काऊंटडाऊन सुरू
श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय अलर्ट मोडवर असून काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून मोठी कारवाई केली जात आहे. एकीकडे दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना त्यांची घरेही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांकडून अनंतनाग, पुलवामा, कुलगाम, शोपियामध्ये शोध मोहीम सुरू आहे. तसेच घरांचीही झडती घेण्यात येत असून गेल्या ४८ तासांत सुरक्षा दलांनी १७५ हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता काश्मिरात दहशतवाद्यांचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे चित्र आहे.

अतिरेकी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मिरात सुरक्षा विभाग अलर्ट मोडवर असून, अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणादेखील सतर्क झाली असून, त्यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले जात आहे. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तातडीने कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच काश्मिरात सुरक्षा विभाग बारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. सर्वच सुरक्षा यंत्रणांना तसे आदेश देण्यात आल्याने हालचालींवर बारीक लक्ष ठेवतानाच संशयितांचा शोध घेतला जात आहे. एवढेच नव्हे, तर धरपकडही जोरात सुरू आहे.

पहलगाममध्ये अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून निष्पाप लोकांचा बळी घेतल्याने केंद्र सरकारने अतिरेक्यांविरोधात कठोर पावले उचलत चुन चुन के मारेंगे असे धोरण अवलंबले असून, सुरक्षा विभागाला तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षा जवान अतिरेक्यांचा शोध घेऊन धडक कारवाई करीत आहेत. तसेच संशयितांच्याही मुसक्या आवळल्या जात आहेत.

पाच अतिरेक्यांची घरे जमीनदोस्त
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत कठोर धोरण अवलंबले असून आधी २ दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. त्यानंतर ३ दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली. पुलवामा भागात एहसान उल हक शेख या दहशतवाद्याचे, कुलगाममध्ये झकीर अहमद गानियाचे तर शोपियाँमध्ये शाहीद अहमद कुटे या दहशतवाद्याचे घर पाडण्यात आले. या अगोदर शुक्रवारी रात्री उशिरा आसिफ शेख आणि आदिल गुरी या दोन दहशतवाद्यांचे घर पाडले. ब्लास्ट करून ही घरे उद्ध्वस्त करण्यात आली.

टीआरएफने हल्ल्याची
जबाबदारी नाकारली
भारताच्या कठोर पवित्र्यानंतर दहशतवादी संघटना टीआरएफची पाचावर धारण बसल्याचे दिसून आले. पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरून टीआरएफने घूमजाव केले. आधी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. परंतुआता टीआरएफने जबाबदारी नाकारली आहे. त्यांनी यासंबंधीचे पत्रक जारी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR