लातूर : प्रतिनिधी
जिल्हयास पावसाळयात अद्याप पर्यंत अनेक वेळा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा फटका जिल्हयातील सहा तालुक्यातील ३४ धरणांनाही बसला आहे. तसेच धरणांच्या पाळूवर झाडे, झुडपे उगवली आसून सायळ या प्राण्याने कांही धरणांच्या पाळूला छिद्र पाडल्यामुळे अनेक धरणांच्या पाळू खचल्या आहेत. कांही बंधा-यांच्या बाजू खचून पाणी वाहून गेले आहे. तर कांही ठिकाणी धरणांची तात्पुरती डागडूजी करण्यात आली आहे. मात्र क्षतीग्रस्त झालेल्या ३४ पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारे, धरणांची कायमस्वरूपी दुरूस्ती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने १० कोटी १२ लाखाचा दुरूस्तीचा प्रस्ताव तयार केला असून तो मंजूरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.
लातूर जिल्हयात मे महिण्यापासून ते अद्याप पर्यंत अनेक वेळा मुसळधार अतिवृष्टीचा पाऊस होऊन शेती पिकांचे, रस्ते, पुलांच्या बरोबर धरणांचेही नुकसान झाले आहे. बंधा-यांच्या बाजूने पाणी वाहून गेले, तसेच जिल्हयात कांही ठिकाणी सायाळाने पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारे, धरणांना छिद्र पाडल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग होत होता. तर कांही ठिकाणी धरणाच्या पाळूवर झाडे, झुडपे उगवून मोठी झाली आहेत. त्या झाडांच्या मुळया खोलवर गेल्याने अनेक ठिकाणी धरणाला भेगा पडल्या आहेत. पावसाची परस्थिती पाहता अशा धरणातून होणारी पाण्याची गळती तात्पुरती डांगडूजी करून मृद व जलसंधारण विभागाने धरणाचा धोका ओळखून सांडव्याद्वारे पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत धोका टळला असला तरी कायमस्वरूपी दुरूस्ती होणे गरजेचे आहे.