मुंबईत अत्याचार वाढले, महिला असुरक्षित
मुंबई : प्रतिनिधी
मायानगरी मुंबई आज लैंगिक अत्याचाराच्या वेगवेगळ््या धक्कादायक घटनांनी पुन्हा एकदा हादरली आहे. एका ७८ वर्षीय महिलेवर २० वर्षांच्या तरुणाने घरात घुसून अत्याचार केला तर एका अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावून तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, तर तिस-या घटनेत मुंबईच्या मालाड परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो सार्वजनिकरित्या व्हायरल केला. या धक्कादायक घटनांमुळे मुंबई हादरली असून, मायानगरीत महिलांचे जीवन असुरक्षित झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबईच्या दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका ७८ वर्षींय वृद्ध महिलेवर एका २० वर्षांच्या युवकाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या वृद्ध महिलेला विस्मरणाचा आजार असून त्याचा फायदा घेत या युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. घरातील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली असून, नराधम युवकाला अटक करण्यात आली. प्रकाश मोरिया असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावून तिच्या तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात घडली. या प्रकरणी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडील मोबाईल जप्त केला असून ते न्यायवैधक प्रयोगशाळेत तपासणीला पाठविला.
यासोबतच गोरेगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो व्हायरल करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. पीडित मुलगी गोरेगावच्या एका नामंकित शाळेत शिक्षण घेत आहे. १ डिसेंबर रोजी पीडित तरुणीला एका आरोपीने धमकावून विवस्त्र फोटो मागवून घेतला आणि त्याने त्याच्या मित्राला तो फोटो पाठविला. त्याने हा फोटो आणखी एका मित्राला पाठविला आणि तो सार्वजनिक केला. मुंबईत एकाच दिवशी अशा घटना समोर आल्याने मायानगरी हादरली असून, महिलांचे जीवन असुरक्षित झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.