पुणे : प्रतिनिधी
सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन असणा-या एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना एसटीची भाडेवाढ झाल्याची चर्चा समोर येत होती. त्याबाबत आज उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळाने आजपासून प्रवासी भाडेवाढ होण्याची घोषणा केली आहे. आजपासून एसटीने १५ टक्क्यांची भाडेवाढ लागू केली आहे. मात्र या एसटी भाडेवाढीबाबत संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्याप भाडेवाढ करण्यात आली नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे एसटीच्या भाडेवाढीबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे.
अजित पवार आज पुणे दौ-यावर आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाडेवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असे म्हटले आहे.
एसटी भाडेवाढीबाबत जास्तीत जास्त बसेस घेऊन ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांना उत्तम सेवा द्यायची आहे. मात्र तशा पद्धतीने चर्चा अजून चालली आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री दावोसवरून आत्ताच आले आहेत. अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घेतला जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
एसटी भाडेवाढीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय होईल. जनता आणि महामंडळ दोघांच्या हिताचा विचार करून मध्यम मार्ग काढला जाईल.
शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये एसटीची सेवा अधिकाअधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे तसेच नवीन बसेस खरेदी करणे यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
निर्णय कॅबिनेटमध्येच : बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही एसटी भाडेवाढीबाबत मला काही माहिती नाही, असे वक्तव्य केले आहे. कोणतेही भाडेवाढीचे किंवा जनतेसंदर्भात निर्णय हे कॅबिनेटमध्येच होतात. पण अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असेल. एखाद्या वेळेस मला माहिती नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच असे निर्णय झाले पाहिजेत असे मला वाटते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.