22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रअधिवेशन म्हणजे खोदा पहाड निकला चुहा

अधिवेशन म्हणजे खोदा पहाड निकला चुहा

वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

मुंबई : प्रतिनिधी
पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर ठोस उत्तर देता आले नाही. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चुहा आहे, अशी टीका करत काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढत राहील, काँग्रेस सोडणार नाही, अशी ग्वाही विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुंबईत पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित झाले, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर ठोस उत्तरे देता आली नाहीत. मुख्यमंत्र्यांचे भाषणावेळी अवसान गळाले होते. भाषणात मोदी महिमा एवढाच मुख्यमंत्री शिंदेंचा अजेंडा राहिला. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झाले. पण या बळीराजासाठी अर्थसंकल्पात काहीही ठोस तरतूद केली नाही. आताही विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गारपीट, अवकाळीने शेतक-यांचे नुकसान झाले. परंतु सरकारने मदतीचे केवळ आश्वासन दिले. पण लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे, अशी या सरकाची प्रतिमा आहे. शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही. कापसाला हमीभाव नाही, सोयाबीनला भाव नाही. याबाबत सरकारकडून उत्तर नाही. या सरकारने शेतक-याला देशोधडीला लावले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सामाजिक न्याय विभागाचे बजेट २८ टक्क्यांनी कमी केले. महाराष्ट्रातील जनता यांचे राजकीय थडगे बांधेल. नाशिक स्मार्ट सिटी ४० कोटी रुपयांचा घोटाळा, मर्जीतील लोकांना कंत्राट, त्यातून टक्केवारी, लूट आणि लुटीची स्पर्धा सरकारमध्ये सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस सोडणार नाही !
आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या आफवा काही लोक जाणीवपूर्वक पसरवत आहेत. मी कुठेही जाणार नाही. महाराष्ट्र उद्धवस्त करणारांच्या फौजेत सामील होणार नाही.कोणी पुड्या सोडतो, कोणी चर्चा करते. काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढेल ..जिथे आहोत तिथेच इमानदारीने काम करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकवेळ राजकारणातून बाद होईन, राजकारण सोडून देईन. पण पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, उगाच गैरसमज निर्माण करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR