सोलापूर : प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी आमदार, भाजप नेते राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या विरोधी उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर दुस-या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. थिटे यांना आधी अर्ज भरण्यासाठी घ्यावे लागलेले पोलिस संरक्षण आणि त्यानंतर अर्ज बाद झाल्यानंतर ही निवडणूक राज्यभरात चर्चेत आली होती.
खरंतर १७ नगरसेवक बिनविरोध निवडून येऊन देखील उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारीमुळे अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती. नगराध्यक्षपदासाठी केवळ तीनच अर्ज आले होते. त्यात माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचा भाजपकडून, थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला होता.
नगराध्यक्षपदासाठी अवघे ३ अर्ज येऊनही प्रशासनाकडून दुपारी साडेतीनपर्यंत छाननीचे काम चालूच होते. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी जाहीर केले. त्यानंतर अपक्ष सरस्वती शिंदे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज (बुधवारी) अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी पहिल्या काही तासांतच शिंदे यांनी माघार घेतली.
राजन पाटील यांच्या गटाकडून थिटे यांच्या उमेदवारीवर एकही आक्षेप घेण्यात आला नव्हता, अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी सगळे आक्षेप घेतले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही, थिटे यांचा मतदान यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांक चुकीचा आहे, थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही आणि सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे, असे आक्षेप घेण्यात आले होते. हे सर्व आक्षेप ग्रा धरून थिटे यांचा अर्ज बाद घोषित करण्यात आला.

