लातूर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अनधिकृत शाळा सुरु होऊ नये याकरीता शासन निर्णयान्वये सूचित केले आहे. लातूर जिल्हयात यापुढे कुठेही अनधिकृत शाळा सुरु राहील्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल व संबंधित शिक्षणाधिकारी यांचेविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद केले आहे. त्यामुळे शिक्षणाधिका-यांनी गट शिक्षणाधिकारी यांना पत्र काढून सतर्क केले आहे.
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम, २०१२ व महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा, नियम २०२० अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे. विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित केली आहे. परंतु अनेक संस्थांनी शासनाची मान्यता न घेता अनधिकृतपणे शाळा सुरु केल्याचे निदर्शनास आले आहे. कांही संस्था चालक इरादापत्र प्राप्त झाल्यास शाळा मान्यता न घेताच शाळा सुरु करतात असेही निदर्शनास आले आहे. अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अनधिकृत शाळा सुरु होऊ नये याकरीता सदर शासन निर्णयान्वये गटशिक्षणाधिकारी यांना सूचित केले आहे.
तसेच गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या सुचनेत आपल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा सुरु असल्यास सदर शाळेवर योग्य ती कार्यवाही करावी. यापुढे आपल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा आढळून आल्यास आपणास व्यक्तीश: जबाबदार धरुन आपल्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.