तब्बल १४०० कोटींच्या मालमत्तेवर टाच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून कारवाई करण्यात येत असून, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने रिलायन्स ग्रुपशी संबंधित १४०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. आतापर्यंत ईडीने अनिल अंबानी यांची एकूण ९ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ईडीने यापूर्वी ७५०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अनिल अंबानी यांच्या नव्याने जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता नवी मुंबई, चेन्नई, पुणे आणि भुवनेश्वर येथील आहेत. ३१ ऑक्टोबर २०२५ ला जारी करण्यात आलेल्या ५ (१) च्या आदेशानुसार रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडकडून जमा केलेल्या सार्वजनिक पैशांचा कथित दुरुपयोग केल्या प्रकरणी यापूर्वी रिलायन्स ग्रुपच्या ४० हून अधिक संपत्ती अस्थायी रुपयात जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईतील वांद्रे पश्चिम, पाली हिल येथील एका घराचा समावेश होता. कंपनीने काही दिवसांपूर्वी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार ईडीने जप्त केलेली संपत्ती रिलायन्स कम्युनिकेशन्सची आहे. ही कंपनी ६ वर्षानंतर सीआयआरपीतून जात आहे. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्राच्या भविष्यावर कोणता परिणाम होणार नाही, असे म्हटले होते.

