जामठा : प्रतिनिधी
विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार, ४ एप्रिल रोजी जामठा येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला महाराष्ट्रातील राजकारणातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र, या शोकसभेमध्ये उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी. एकाच व्यासपीठावर असूनही या दोघांनी एकमेकांकडे साधे पाहिलेही नाही.
दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सभेतील सर्वांत चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अनिल देशमुख आणि परमबीर सिंह. परमबीर सिंह हे मेघे कुटुंबाचे जवळचे नातेवाईक (सागर मेघे यांचे व्याही) असल्याने ते या सभेत उपस्थित होते. सुरुवातीला परमबीर सिंह यांचे आगमन झाले. त्यानंतर काही वेळाने अनिल देशमुख व्यासपीठावर पोहोचले. देशमुख यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना नमस्कार केला, मात्र समोरच बसलेल्या परमबीर सिंह यांच्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, दोघांनीही एकमेकांकडे साधे पाहिले सुद्धा नाही. १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांमुळे या दोघांमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे, त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा या सार्वजनिक व्यासपीठावर आला.
दरम्यान, मार्च २०२१ मध्ये, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खळबळजनक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी असा आरोप केला की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी रुपये बार आणि रेस्टॉरंटमधून गोळा करण्याचे लक्ष्य दिले होते. परमबीर सिंह यांच्या या आरोपानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली होती यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

