निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या वादातून २६ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. सोहेल गुलाब पठाण(रा. काटेजवळगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
सोहेल पठाण यांचे गावातील एका नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून संबंधित दोन कुटुंबांमध्ये यापूर्वी अनेकदा वाद झाले होते. हा वाद वाढत गेल्यानंतर शनिवारी सायंकाळी सोहेल यांच्यावर बकरे कापण्यासाठी वापरण्यात येणा-या र्सुयाने वार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात सोहेलचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
















