लातूर : प्रतिनिधी
लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे हे दि. २८ मे रोजी नांदेडहून लातूरला येत होते. नांदेड-लोहा महामार्गावरील जनापुरी गावाजवळ दुचाकीचा अपघात होऊन एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. या जखमीस पाहूण खासदार डॉ. काळगे यांनी स्वत:ची गाडी थांबवून खाली उतरले आणि जखमीला उचलून पोलिसांच्या गाडीतून त्या जखमीस उपचारासाठी रवाना केले. खासदार डॉ. काळगे यांच्या या तत्परतेमुळे अपघातातील जखमीचे प्राण वाचले.
नांदेड-लोहा महामार्गावर अधीच एक अपघात झालेला होता. त्यामुळे घटनास्थळी तीन पोलीस अधिकारी व काही नागरिक उपस्थित होते. परंतू, पोलिस अधिका-यांनी दुचाकीच्या अपघातातील जखमीकडे पाहिलेसुद्धा नाही. मात्र खासदार डॉ. काळगे तेथे पोहोचले त्यांनी त्या जखमीस पाहिले. जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तीन तीन पोलीस अधिकारी असूनही त्या जमखीची मदत करीत नव्हते.
तेव्हा खासदार डॉ. काळगे यांनी त्या तीन पोलिस अधिका-यांकडे चौकशी केली असता त्यांनी आम्ही रुग्णवाहिकेची प्रतिक्षा करीत आहोत, असे त्या तीन पोलिसांनी सांगीतले. त्यावर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी जखमीस पोलीस व्हॅनमध्ये तात्काळ घेऊन जात, अशी सूचना केली आणि स्वत: त्यांनी जखमीस उचलले नागरिकांनीही मदत केली. त्यामुळे तो जखमी वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात पोचू शकल्याने त्याचे प्राण वाचले.