मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या ९ लाख होणार आहे. यापूर्वी ५ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती. आता नव्याने ४ लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारकडून नवे निकष लागू केले जातील. पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जाणार आहेत.
नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या ५ लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त ५०० रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणा-या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहे. वाहने असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांनाही यातून वगळण्यात आले आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवे निकष
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. दरवर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे. ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे.
महिलांच्या अर्जांची फेरतपासणी
या योजनेतील सुमारे १६.५ लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती आहे.