कंदाहार : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील तालिबानी नेत्याने म्हटले आहे की, देशात पाश्चिमात्य देशांच्या कायद्याची गरज नाही. येथे शरिया कायदा लागू झाल्याने लोकशाही संपुष्टात येईल. कंदाहारमधील ईदगाह मशिदीत ईद-उल-फित्रनिमित्त हिबतुल्ला अखुंदजादा यांनी हे वक्तव्य केले.
पश्तो भाषेत बोलताना अखुंदजादा यांनी इस्लामी कायद्यांचे महत्त्व अधोरेखित केले. पाश्चिमात्य देशांच्या कायद्याची गरज नाही, असे ते म्हणाले. आम्ही स्वत:चे कायदे बनवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तालिबानने शरिया कायद्यांमुळे अफगाणी महिला आणि मुलींवर अनेक निर्बंध लादले आहेत. या बंदीमुळे महिलांना त्यांचे शिक्षण, नोकरी आणि बहुतांश सार्वजनिक ठिकाणांपासून वंचित राहावे लागले आहे. अशा निर्णयांमुळे तालिबान जागतिक पटलावर एकाकी पडला आहे. याशिवाय त्यांनी चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह काही देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत.
अखुंदजादा यांनी पाश्चिमात्य देशांच्या कायद्यांवर टीका करताना म्हटले की, मुस्लिमेतर मुस्लिमांच्या विरोधात एकवटले आहेत आणि अमेरिका व इतर देश इस्लामविषयी आपापली मते तयार करण्यासाठी एकवटले आहेत. गाझामधील इस्रायल-हमास युद्धाचाही त्यांनी उल्लेख केला.
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही संपुष्टात आली असून शरिया लागू आहे. लोकशाही समर्थक लोकांना तालिबान सरकारपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानला देशांतर्गत किंवा देशाबाहेर विश्वासार्ह विरोधी पक्ष नाही. सध्या अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली सत्तेचे केंद्रीकरण होत असल्याची टीका प्रशासनातील काही ज्येष्ठांनी केली आहे.