काबूल : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्यात असलेली सात ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स चोरीला गेली आहेत. यूएच-६०ए ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स उझबेकिस्तानने अमेरिकेच्या ताब्यात दिली आहेत. ही हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तान हवाई दलाच्या ताफ्यात होती. मात्र आता ही हेलिकॉप्टर्स हातातून निसटल्याने तालिबानचा संताप अनावर झाला आहे.
तालिबानने उझबेकिस्तान आणि अमेरिकेला धमकी दिली आहे. ही हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तानची मालमत्ता असल्याने ती आपल्याला परत मिळावीत, अशी मागणी तालिबानने केली आहे. जवळपास २० वर्षे नियंत्रण ठेवल्यावर २०२१ मध्ये अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला होता.
अफगाणिस्तानमध्ये त्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने सत्ता प्रस्थापित केली होती. तसेच अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या पाठिंब्याने स्थापित सरकार कोसळले होते. हे सरकार कोसळल्यानंतर वैमानिकांनी देशातून पलायन करण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर केला होता. तेव्हापासून हे हेलिकॉप्टर्स उझबेकिस्तानमध्येच होते.
यूएच-६०ए ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्स हे अनेक युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांचा वापर हा आखाती युद्ध, सोमाली युद्ध आणि अफगाणिस्तान युद्धामध्ये करण्यात आला होता. या हेलिकॉप्टर्सची मजबूत रचना आणि अनुकूल क्षमतेमुळे जगभरातील लष्करांकडून या हेलिकॉप्टर्सना मागणी आहे.
या सात हेलिकॉप्टर्सचे हस्तांतरण मध्य आशियातील बदलत्या भूराजकीय परिस्थितीचे एक उदाहरण आहे. आता या हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून अमेरिका आपला या भागातील लष्करी ताफा अधिकच भक्कम करण्यास सक्षम होणार आहे. मात्र तालिबानच्या नेतृत्वातील अफगाणी संरक्षण मंत्रालयाने या हेलिकॉप्टर्सच्या हस्तांतरणावरून नाराजी व्यक्त केली आहे.