लातूर : विनोद उगीले
जिल्ह्याच्या वाढत्या पसा-यामुळे लातूरसह जिल्ह्यातील इतर शहर व खेड्यापाड्यातून ही वाहन चोरीचे प्रमाण वरचेवर वाढतच चालले आहे. मागच्या तीन वर्षाचे वाहन चोरीचे पोलीसांचे रेकॉर्ड पाहिले तर लातूर जिल्ह्यात तब्बल जुन्या वापरातील ८ कोटी २१ लाख ४५ हजार ५०६ रूपयांच्या वाहनांची चोरी झालेली आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात १ हजार ४७१ गुन्हे दाखल असून यापैकी केवळ ३२४ वाहन चोरीची गुन्हे उघड करण्यात लातूर पोलीसांना यश आले असून त्यांनी या कारवाईतून २ कोटी ६९ लाख ७२ हजार ४२२ रूपयांची वाहने वाहन चोरांकडून सोडवली आहेत.
घरासमोर, सोसायटीच्या पार्किंग मध्ये, दुकानासमोर, सार्वजनिक पार्किंग मध्ये, रस्त्याच्या बाजूला शेतीचा बांध ही अशी एकही जागा शिल्लक नाही, जिथून वाहने चोरीला जात नाहीत. वाहनांचे लॉक तोडून अवघ्या काही मिनिटात वाहने चोरून नेली जातात. यामुळे जिल्ह्यात सराईत वाहन चोरट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी पोलिसांनी दुचाकी वाहने चोरणा-या अनेक टोळ्यांना पकडले आहे. पण यामुळे वाहन चोरट्यांचा पुरेसा बंदोबस्त अद्याप झालेला नाही.
दररोज लातूर शहरासह जिल्ह्यातील इतर शहराबरोबरच खेड्यापाड्यातील कोणत्यातरी भागातून दररोज दोन-चार वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस येतात. पोलिसांचे नेटवर्क वाहन चोरट्यांपर्यंत अजूनही पुरते पोहोचू शकलेले नाहीत.
काही गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी अगोदर एखादे वाहन चोरतात आणि त्याच वाहनाचा वापर करून गंभीर गुन्हा करतात, असेही काही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे वाहने चोरीला जाणे ही बाब तेवढ्यापुरती मर्यादित नसून पुढे गंभीर गुन्हे होण्याची देखील शक्यता आहे.