छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप केला आहे. सत्तारांनी लाटलेल्या अनुदान प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर झाल्याचे भासवून सत्तारांनी शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही कुंभार यांनी केली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेतील अनुदानात घोटाळा झाल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. २०१५ पासून २ लाख वार्षिक अनुदान दिले जात होते. ४ ऑक्टोबर २०२४ च्या बैठकीत अनुदानवाढीचा कोणताही प्रस्ताव नव्हता. तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचे भासवण्यात आले.
७ ऑक्टोबर २०२४ ला अनुदान १० लाखांपर्यंत वाढवण्यात आले. हे वाढीव अनुदान १६ शाळांना मंजूरही करण्यात आले. या शाळांना अनुदान देण्याची प्रक्रिया ६ दिवसांत पूर्ण करण्यात आली. अनुदान मिळालेल्या शाळा अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील आहेत. या शाळांचा अब्दुल सत्तारांशी संबंध असल्याचा संशय असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सांगतात.
प्रकरणाची चौकशी होईल
राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. याची चौकशी होईल. त्यात काही तथ्य असेल तर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. याआधीही मंत्री असताना अब्दुल सत्तारांवर अनेक आरोप झाले आहेत. त्यात आता विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तारांवर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी लावली जाते का आणि त्यातून काय तथ्य बाहेर येते हे पाहावे लागेल.