24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्याअब्दुल सत्तार, संजय राठोड नापास; रिपोर्ट कार्ड आलं, मंत्रीपदही जाणार?

अब्दुल सत्तार, संजय राठोड नापास; रिपोर्ट कार्ड आलं, मंत्रीपदही जाणार?

मुंबई : विशेष प्रतिनिधी
अनेक आमदारांनी मंत्रिपदाच्या यादीत आपला नंबर लागावा म्हणून लॉबिंग सुरू केली आहे. मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटाने एका एजन्सीमार्फत मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले. त्यात दोन मंत्री नापास ठरले असून मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचे तसेच इच्छुक आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केले आहे. यात दोन माजी मंत्री नापास ठरले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे यात नापास झाले आहेत. मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले पाच आमदार पास झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. यातील काही नेत्यांनी आपली इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे. काही लोकांचा मागच्या टर्ममध्येच नंबरही लागणार होता. तर काही इच्छुकांच्या समर्थकांनी भावी मंत्री म्हणून त्यांच्या मतदारसंघात बॅनरही लावले आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाने केलेल्या पडताळणीत हे पाचही आमदार पास झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद देणार की वेगळा काही निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीमध्ये शिवसेनेला १३ ते १४ मंत्रिपद मिळणार असल्याची माहीती आहे. यापैकी १० ते १२ मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडे ६० आमदारांचे बळ आहे. त्यापैकी फक्त १० ते १२ आमदारांनाच मंत्रिपद दिलं जाणार असल्याने आमदार निवडताना एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले संभाव्य मंत्री
गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR