मुंबई : वृत्तसंस्था
गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा बरेली येथील बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार झाला. आता कुख्यात गॅँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दिशा पाटनीचे वडील, निवृत्त उपअधीक्षक जगदीश पटानी हे या घरात राहतात. पहाटे ४.३० च्या सुमारास, सिव्हिल लाईन्स येथे असलेल्या दिशाच्या वडिलांच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि भिंतीवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार-पाच राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आता त्यांच्या घराबाहेर तात्काळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आता रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे समोर आले आहे. या गॅँगने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की त्यांनी दिशाची बहीण खुशबू पाटनीने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल केलेल्या कमेंटचा बदला घेतला आहे. पोस्टमध्ये धमकी देण्यात आली आहे की जर कोणी संत आणि धर्मांविरुद्ध कमेंट केली तर त्याने परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे. पण, आता ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.
पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, भावांनो आज खुशबू पाटणी/दिशा पाटणी यांच्या घरी झालेला गोळीबार ही एक कारवाई आहे. त्यांनी आमचे पूज्य संत प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचा अपमान केला. त्यांनी आमच्या सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पूज्य देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हे फक्त एक ट्रेलर होते. पुढच्या वेळी जर कोणी किंवा त्यांनी आमच्या धर्माबद्दल अशाप्रकारची असभ्यता दाखवली तर आम्ही त्यांच्या घरात कोणालाही जिवंत सोडणार नाही.