ढाका : बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर्रहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारणा-या अभिनेत्री नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे. रविवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला अटक करण्यात आले. नुसरत फारियाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. जुलै २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सरकारविरोधात मोठे आंदोलन उसळले होते. याच आंदोलनाशी संबंधित हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात तिचा सहभाग असल्याचा आरोप आहे. नुसरत फारियासह एकूण १७ कलाकारांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ढाकातील वातारा भागात एका विद्यार्थ्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी २०२३ मध्ये ‘मुजिब : द मेकिंग ऑफ अ नेशन’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात नुसरत फारियाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारली होती.