मुंबई : प्रतिनिधी
छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन झाले आहे. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी तिचे निधन झाले. ती अवघ्या ३८ वर्षांची होती. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर रविवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.
प्रिया मराठे ही मध्यंतरी कर्करोगातून बरीही झाली होती. तिने यानंतर परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोगाने पुन्हा डोकेवर काढले होते. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते.
प्रिया मराठे हिचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाणे, महाराष्ट्र येथे झाला. ती ३८ वर्षांची होती. मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचे बालपण घडले. अकरावीमध्ये शिकत असताना प्रियाला महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली. अभिनयातील वाढते आकर्षण त्यांनी करिअर म्हणून स्वीकारले.
मराठी मालिकांमधून अभिनयाची सुरुवात
२००५ साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेमधून प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधील त्यांच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषत: तिच्या निगेटिव्ह भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
हिंदी टेलिव्हिजनमध्ये यशस्वी पदार्पण
हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या प्रवासाची सुरुवात ‘कसम स’ या मालिकेतील ‘विद्या बाली’ या भूमिकेपासून झाली. पुढे ‘पवित्र रिश्ता’मध्ये ‘वर्षा’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’मध्ये ‘ज्योती माल्होत्रा’च्या भूमिकांनी तिने घराघरात पोहोचवले.
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील सहकलाकार सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनावर प्रिया हिने भावनिक प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले होते, He had guts to follow his dreams’ असे तिने म्हटले होते.
इतर महत्त्वाच्या भूमिका आणि नाट्यसृष्टीतील योगदान
‘साथ निभाना साथिया’ मालिकेत त्यांनी ‘भावनी राठोड’ ही नकारात्मक पण ठसठशीत भूमिका साकारली होती. मराठी इतिहासावर आधारित ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत त्यांनी ‘गोदावरी’ची भूमिका अतिशय समरसून साकारली. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील ‘मोनिका’ ह्या भूमिकेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली. नाटक क्षेत्रातही प्रिया तितकीच सक्रिय होती. A Perfect Murderlआणि Kon Mhanta Takka Dilal यांसारख्या नाटकांतून त्यांनी रंगभूमीवरही आपली छाप सोडली आहे.
वैयक्तिक आयुष्य
प्रिया मराठे यांनी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी २४ एप्रिल २०१२ रोजी विवाह केला. त्यांनीही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रियाला बॅडमिंटन, प्रवास आणि वाचनाची विशेष आवड होती. पिझ्झा, पास्ता आणि पुरणपोळी हे तिचे आवडते पदार्थ होते. त्याचबरोबर ती अध्यात्मिकतेतही आस्था ठेवायची. प्रिया मराठे यांचा अभिनय प्रवास हा मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचा ठरलेला आहे.
प्राजक्ता माळीकडून शोक व्यक्त
प्रिया मराठे हिच्या निधनाबद्दल मराठी अभिनेत्री आणि सूत्रसंचालक प्राजक्ता माळी हिनेही शोक व्यक्त केला. आम्ही दोघींनी ‘एकापेक्षा एक’ आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते. प्रिया मराठे ही एक गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती आपल्या कामाशी काम ठेवायची. तिने कधीच दुस-यांना त्रास दिला नाही. तिच्या कामावर तिचे नितांत प्रेम होते.देव अशी चांगली माणसं का नेतो, असा प्रश्न मला पडला आहे, असे प्राजक्ता माळी हिने म्हटले.