जळगाव : भुसावळ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात प्लंबर लायसेन्स नूतनीकरणासाठी गेलेल्या व्यक्तीकडून ७०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अभियंता, लिपिक व कंत्राटी कामगाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या तिघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार (वय ४६ ) हे प्लंबर असून त्यांना दरवर्षी लायसेन्सचे नूतनीकरण करावे लागते. यासाठी ते पाणीपुरवठा विभाग, भुसावळ येथे गेले असताना कार्यरत असलेला कंत्राटी कामगार शाम समाधान साबळे (वय २८) याने लायसेन्स नूतनीकरणासाठी ७०० रुपयांची लाच मागितली.
त्यानंतर साबळे याने विभागातील अभियंता सतीश सुरेशराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला. देशमुख यांनी ६०० रुपये देण्यास सांगितले. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. सापळा रचून तक्रारदाराने लाचेची रक्कम साबळे यांच्याकडे दिली असता, त्यांनी शांतराम उर्खडु सुरवाडे यांना फोन करून ‘साहेबांनी पैसे घ्या’ असे सांगितले. यानंतर शांतराम सुरवाडे यांनी ६०० रुपये लाच स्वीकारली, त्याच वेळी त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.