21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअभूतपूर्व पेच

अभूतपूर्व पेच

ईव्हीएमच्या निषेधार्थ मविआ आमदारांचा शपथ घेण्यास नकार, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

मुंबई : प्रतिनिधी
सत्ताधारी महायुतीने विधानसभा निवडणुकीत मिळवलेले बहुमत हा जनतेचा कौल नाही तर ईव्हीएमच्या मदतीने मिळवलेले यश आहे. भाजपा महायुतीचे सरकार जनतेच्या मतांचे सरकार नाही, अशीच सार्वत्रिक भावना आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यास नकार दिला. विधानसभेत सुरू असलेल्या शपथविधीवर बहिष्कार घातला. यामुळे १५ व्या विधानसभेच्या पहिल्याच दिवशी सभागृहात पेच निर्माण झाला आहे. २८८ पैकी १७१ सदस्यांनी शपथ घेतली असून, रविवारी उर्वरित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. विरोधी आमदारांनी उद्या शपथ न घेतल्यास अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण होणार आहे.

नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन आज सुरू झाले. नवनिर्वाचित सदस्यांना भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्याची शपथ घ्यावी लागते. आज अधिवेशनाची सुरुवात झाल्यानंतर विधानसभेचे राज्यपालांनी नियुक्त केलेले हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया सुरू केली. पण राष्ट्रगीत झाल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी ईव्हीएम घोटाळ््याचा निषेध म्हणून शपथविधीवर बहिष्कार टाकला. एकीकडे महायुतीचे आमदार विधीमंडळात शपथ घेत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे आमदारांनी बाहेर निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. बहिष्काराची कल्पना नसल्याने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांनी शपथ घेतली. त्यात समाजवादी पक्षाचे दोन व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील वडगाव-शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आमदारकीची शपथ घेतली.

दरम्यान, विरोधकांना उद्याच्या सत्रात सदस्यत्वाची शपथ घेण्याची संधी आहे. त्यांनी उद्याही शपथ घेतली नाही तर पेच निर्माण होणार आहे. त्यांना नंतर अध्यक्षांच्या दालनात शपथ घेता येईल. पण शपथ घेईपर्यंत सभागृहात बोलता येणार नाही, असे विधिमंडळातील उच्चपदस्थ अधिका-याने सांगितले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही याला दुजोरा दिला.

मतदानचोर सरकारचा निषेध : पटोले
महविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार यांनी शपथविधीवर घातलेल्या बहिष्काराची माहिती प्रसार माध्यमांना दिली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही, अशीच भावना जनतेत आहे. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे, तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहोचवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे, असे पटोले म्हणाले.

हा जनतेचा कौल
नाही : आदित्य ठाकरे
शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी निषेध म्हणून आम्ही आमदारकीची शपथ घेतली नसल्याचे सांगितले. हा जनतेने दिलेला कौल आहे की निवडणूक आयोगाने हा सर्वांच्या मनातला प्रश्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ते प्रश्न जनतेच्या मनातले आहेत. आम्ही हरलेलो नाही, तरीही आमच्या मनात ईव्हीएमबाबत शंका आहे. २०१४ पासून देशात लोकशाही मारण्याचे काम सुरु आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

विरोधक रडीचा डाव
खेळतायत : अजित पवार
लोकसभेला याच ईव्हीएमने महाविकास आघाडीला ३१ जागा दिल्या, त्यावेळी या मशीनबाबत काहीच तक्रार नव्हती आणि आता विधानसभेत महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला तर मविआने ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. विधानसभेत महायुतीला इतके बहुमत मिळाले आहे की आता विरोधक दुसरे काहीही कारण सांगू शकत नाहीत. त्यामुळे ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मविआच्या आमदारांना शपथ घेण्यासाठी अजूनही उद्याचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा त्यांना सोमवारी कामकाजात भाग घेता येणार नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह
१७१ सदस्यांनी घेतली शपथ
विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह १७१ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. शपथविधीसाठी भाजपाचे आणि शिवसेनेचे (शिंदे) आमदार भगव्या फेट्यांमध्ये तर राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार गुलाबी फेटे घालून विधानभवनात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR