अमरावती : प्रतिनिधी
शहरात नव्याने सहा कोरोना पॉझिटिव्ह, तर एक रुग्ण स्वाईन फ्लूचा आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. बुधवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या नमुने चाचणीच्या अहवालातून ही बाब निदर्शनास आली आहे.
त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेने उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला असून, नमुने तपासणीवर भर दिला जाणार आहे.
हल्ली पावसाळा असल्यामुळे वातावरणातील बदल आणि साथरोगांची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कोरोनाने डोके वर काढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यंदा उन्हाळ्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता पावसाळ्यात साथरोगांची लागण वाढली असून, शासकीय, खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या दरदिवशी वाढतच आहे.
अशातच जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून २४ ते ३० जुलै यादरम्यान एकूण १४० जणांचे नमुने चाचणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविले असता यात सहाजण कोरोना पॉझिटिव्ह, तर एक रुग्ण स्वाईन फ्लूचा आढळला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या ६० वर्षीय रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.