38.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रअमरावतीत पहिल्या विमानाचे सुरक्षित लँडिंग; १४ वर्षांची प्रतीक्षा संपली

अमरावतीत पहिल्या विमानाचे सुरक्षित लँडिंग; १४ वर्षांची प्रतीक्षा संपली

अमरावती : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेला अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय उड्डाण मंत्री कीजरापू राम मोहन नायडू यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. आजपासून अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती विमानसेवेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विमानाचे बुकिंग हाऊसफूल होते.

अमरावती विमानतळासोबतच आशिया खंडातील सर्वांत मोठ्या एअर इंडिया वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे देखील आज लोकार्पण पार पडणार आहे, या विमानतळामुळे अमरावतीच्या विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, ७२ आसनी विमान अमरावती ते मुंबई व मुंबई ते अमरावती असे आठवड्यातून तीन वेळा असेल. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस आठवड्यातून विमानसेवा असेल.

१४ वर्षांनंतर आज अखेर अमरावतीकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबईवरून पहिले विमान अमरावती विमानतळावर सुरक्षित लँड झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यांसह इतर मंत्र्यांनी पहिल्या विमानाने प्रवास केला. अमरावती विमानतळावर विमान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पहिले विमान लँड झाल्यानंतर अमरावती विमानतळावर मोठा जल्लोष करण्यात आला.

नव्या विकासपर्वाला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या विमानाचे नवनिर्मित अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते, असे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR