अमरावती : अमरावती-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या उपक्रमांना वेग येत असल्याचे दिसून येत आहे. वर्षाचे सर्व १२ महिने खूप गर्दी असलेल्या अमरावती-पुणे मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांसाठी लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू केली जाईल, असे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी स्वत: दिले आहेत. त्यामुळे अमरावतीकर व अन्य शहरातील प्रवाशांची आशा बळावली आहे.
हडपसर येथून सुरू होणा-या जोधपूर एक्स्प्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल भगतकीकोठी एक्सप्रेसचे उद्घाटन नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली. या ‘वंदे भारत’ला बडनेरा येथे थांबा देखील असल्याने, अमरावतीच्या प्रवाशांनाही फायदा होईल. नागपूर-पुणे मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांसाठी वैष्णव यांचे हे संबोधन खूप दिलासा देणारे आहे. कारण या मार्गावर प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांची संख्या हजारोंमध्ये आहे.
बहुतेक प्रवासी या १४ ते १६ तासांच्या प्रवासासाठी रेल्वे निवडणे पसंत करतात; त्यामुळे हा मार्ग ३६५ दिवस गर्दीने भरलेला असतो. परिणामी, या मार्गावर अनेक लोकांना कन्फर्म तिकिटे मिळू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, लोकांना कोणत्याही मार्गाने तिकिटे खरेदी करून प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत बरेच लोक खासगी बसेसचा पर्याय निवडतात. पण बसने इतका लांब प्रवास खूप महाग असतो. याशिवाय, बसचे भाडेही खूप जास्त असल्याने, अनेक वर्षांपासून या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावावी, अशी अपेक्षा लोक करत आहेत.