लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकटे हे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, दरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळत बसणे ही शेतकरी व महाराष्ट्रच्या राजकारणासाठी हिताची बाब आहे का ? हा सर्वात मोठा सवाल जनतेसमोर उभा आहे. या संदर्भाने सदर मंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणा-यांना अमानुष मारहान करण्यात आली. या प्रकरणी मारहाण करणा-यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी युवा भिम सेनेच्या वतीने पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विधीमंडळ हे काही जुगार खेळायचे ठिकाण नाही, त्याचबरोबर रविवारी खासदार सुनिल तटकरे हे लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर असतांना लातूर येथील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निषेधाचे पत्र दिले. तसेच जुगाराचे पत्ते त्यांना देवून सांगितले की, हे कृषीमंत्र्यांना दया, अत्यंत शांत पध्दतीने केलेल्या आंदोलनाला उग्र रूप देण्याचा प्रयत्न राष्ट्रीवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे. यात छावाच्या पदाधिका-यांना आमानुष मारहान करण्यात आली. ही लातूरच्या समाजकारणाला व राजकारणाला लाजीरवाणी बाब आहे. जिल्हाधिका-यांनी या प्रकरणात ज्या लोकांनी अमानुष मारहान केली अशा गुन्हेगारास तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी. सध्या लातूर जिल्ह्यातील वाढत्या घटना पाहता पोलीस अधीक्षक यांनी संबंधीत घटनेमध्ये जातीने लक्ष घालून आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करावे. या कालच्या प्रकरणामुळे लातूर येथील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे युवा भिम सेनेकडून आम्ही या कृत्याचा जाहिर निषेध व्यक्त करतो. या प्रसंगी युवा भिम सेनेचे अध्यक्ष पंकज काटे, प्रदेशाध्यक्ष कुमार कांबळे, प्रवक्ते सुफी सय्यद, शमशोद्दीन महेबूब सय्यद, युवा जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे, विशाल भोसले, शिरीष मांदळे, रत्नदीप रायभोले, सिध्दार्थ गवळी आदी उपस्थित होते.