अजित पवार म्हणतात दुस-या कामासाठी गेलो होतो
मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह मंत्रालयासह महत्त्वाच्या खात्यासाठी अडून बसलेले असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीलाही शिवसेनेएवढेच मंत्रिपदे द्यावीत, यासह केंद्रात मंत्रिपद आणि राज्यपालपदाच्या मागणीसाठी अजित पवार यांनी राजधानी दिल्लीत सलग दोन दिवस गेले. परंतु त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वेळ दिला नसल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, अजित पवार यांनी याबाबत खुलासा करताना आपण अमित शाह यांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो, तर माझी वैयक्तिक कामे होती, असे सांगितले. परंतु यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले.
दरम्यान, यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, मी माझ्या वेगळ््या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. पण वृत्तवाहिन्यांनी वेगळीच बातमी चालवली. अजित पवारांना आज भेट नाकारली. उद्या भेट नाकारली, अशा बातम्या चालवल्या. पण मी त्यांना भेटायला गेलोच नव्हतो. मी माझ्या वेगळ््या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. मी अमित शाह यांना भेटायलाच गेलो नव्हतो, तर त्यांनी भेट नाकारायचा प्रश्नच येत नाही. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्या आहेत. खासदार म्हणून ११ जनपथ हा बंगला त्यांना देण्यात आला आहे. त्या बंगल्यात काय बदल करता येतील, हे बघण्यासाठी आर्किटेक्टला घेऊन गेलो होतो, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
न्यायालयीन कामकाजासाठी दिल्लीत
याबरोबरच सर्वोच्च न्यायालयात आमच्या काही केसेस सुरू आहेत. या सर्व खटल्यांचे काम प्रफुल्ल पटेल पाहत होते. मी वकिलांना कधी भेटलो नव्हतो. त्यामुळे आमच्या खटल्यांचे काम पाहणा-या वकिलांबरोबर भेट घेतली. घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आमचे प्रकरण आहे. तसेच एका जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. अशा तीन गोष्टींसाठी प्रामुख्याने मी दिल्लीला गेलो होतो, अशीही माहिती अजित पवार यांनी दिली.
.