लातूर : प्रतिनिधी
अल्पसंख्यांक तरुण अमीर पठाण यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या व्यक्तीविरोधात कठोर करावाई करुन त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल सात दिवसांत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगास सादर करावा. निर्धारीत कालावधीत आपला अहवाल प्राप्त न झाल्यास आयोग अधिनियम २०१२ कलम १०(क) नुसार सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येतील, असे निर्देश अल्पसंख्यांक आयोगाचे सचिव सारंगकुमार पाटील यांनी लातूरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य डॉ. अफसर शेख यांच्या सूचनेवरुन आयोगाने दि. ५ मे रोजी लातूरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना उपरोक्त पत्र पाठवले आहे. त्यात अमीर पठाण या तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. सदर बाब ही अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तीशी निगडीत असल्याने सदर निवेदनातील बाब आणि वर्तमानपत्रातील प्रसिद्ध बातम्या विचारात घेता तातडीने कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल सात दिवसांत सादर करण्यात यावा. निर्धारीत कालावधीत आपला अहवाल प्राप्त न झाल्यास आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरीता आदेश देण्यात येतील, असेही आयोगाचे सचिव सारंगकुमार पाटील यांनी पत्रात नमुद केले आहे.