लातूर : प्रतिनिधी
येथील संविधान चौकात एका आठवड्यापूर्वी अनोळखी पत्रकाराने आमीर गफुर पठाण या तरुणास तू पाकिस्तानहून आला का?, तू बांगलादेशी आहेस का?, असे म्हणून त्याच्या अवघड जागी मारहाण करुन त्याचा व्हीडीओ व्हायरल करतो म्हणून धमकी देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. याबाबत मयत आमीरच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आरोपीस अद्याप अटक झालेली नाही. आरोपी अटक करावे, यामागणीसाठी दि. १२ मे रोजी समस्त लातूरकरांच्या वतीने येथील महात्मा गांधी चौकात ‘इन्साफ दो’आंदोलन करण्यात आले.
अतिश्य शुल्क कारणावरुन अनोळखी पत्रकाराने आमीर पठाण यास मारहाण केली. त्याच्या गुप्तांगावरही मारहाण केली. व या मारहाणीचे चित्रीकरण करुन ते समाजमाध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी दिली. या मानसीक तणावातून आमीर पठाण या तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस त्याचा शोधही घेत आहे. परंतू, पोलिसांना त्याचा सुगावाच लागत नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी समस्त लातुरकरांच्या वतीने सोमवारी ‘इन्साफ दो’आंदोलन करण्यात आले. लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी ‘इन्साफ दो’ आंदोलनास भेट दिली. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे यांची उपस्थिती होती. ‘इन्साफ दो’आंदोलनात अॅड. लालासाहेब शेख, सलमान पठाण, बशीर शेख, अबरार शेख, नसीर शेख, सरफराज शेख, मुस्तकीन सय्यद, मोईज शेख, आर. वाय. मशायक, अॅड. समद पटेल, मोईनोद्दिन शेख, अॅड. फारुक शेख, अबदूल्ला शेख, शाहबाज पठाण, वाजीद मणियार, मोहसीन खान, अहेमदखा पठाण, तब्रेज तांबोळी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.