नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर अदानी समूह, मणिपूर हिंसाचारासह विरोधी पक्षाने विविध मुद्दे लावून धरल्याने पहिला आठवडा वादळी ठरला. दुस-या आठवड्यात मंगळवारी व बुधवारी संसदेचे कामकाज नीट चालले. मात्र, विरोधक बा शक्तींच्या मदतीने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केल्यानंतर गुरुवारी संसदेचे कामकाज तहकूब झाले होते. शुक्रवारी देखील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे संबंध अमेरिकन व्यावसायिक जॉर्ज सोरोस यांच्याशी जोडल्याने सुरुवातीला लोकसभेचे कामकाज थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात झाले.
सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य प्रहरात दुबेंनी ‘कांग्रेस का हाथ, सोरोस के साथ’ असे म्हणत विरोधकांना लक्ष्य केले. त्यानंतर पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी शून्य प्रहर सुरू करत दुबेंना बोलण्याची संधी दिली.
मात्र, त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर काँग्रेस सदस्यांनी आक्रमक होत गदारोळ सुरू केला. दरम्यान, दुबेंनी राहुल गांधींना १० प्रश्न विचारणार असल्याचे स्पष्ट करत लोकसभा विरोधी पक्षनेत्याचे जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध जोडले. यावर आक्षेप घेत काँग्रेस सदस्यांनी आसनाजवळ येत घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.