कराची : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे आता हळू हळू समोर येऊ लागले आहे. पाकिस्तान आपले हात झाडत असला तरी भारतामध्ये होणा-या प्रत्येक दहशतवादी घटनांमध्ये त्यांचा आजवर हात राहिलेला आहे. आता तर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानेच टीव्ही मुलाखतीत पाकिस्तान गेली ३० वर्षे अमेरिका आणि ब्रिटनसाठी दहशतवाद पोसत, पसरवत आला आहे, अशी कबुली दिली आहे.
ख्वाजा आसिफ यांनी ब्रिटनच्या स्काय टीव्हीला ही मुलाखत दिली आहे. यात त्यांनी पाकिस्तान दशकांपासून दहशतवादी संघटनांचे समर्थन, सहाय्य आणि त्यांना फंड देण्यात सहभागी असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आला आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
ख्वाजा यांनी पाकिस्तान एक पीडित असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याच्या भूमिकेवर विचारण्यात आल्यावर त्यांनी अमेरिका, ब्रिटन आणि पश्चिमी देशांसाठी गेली ३० वर्षे घाणेरडे काम करत आहोत. पाकिस्तानचा हा निर्णय एक मोठी चूक होती त्याचे परिणाम भोगत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
जर आम्ही सोव्हिएत संघाविरोधातील युद्धात सहभागी झालो नसतो तसेच ९/११ च्यानंतर युद्धात सहभागी झालो नसतो तर पाकिस्तानचा रेकॉर्ड डागाळलेले नसते. अमेरिकेसारख्या मोठ्या शक्तींनी पाकिस्तानला दहशतवादासाठी दोषी ठरविणे त्यांच्यासाठी कठीण नाही. आम्ही त्यांच्यासाठी १९८० मध्ये युद्ध लढलो होतो. आताचे हे दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये झोपत होते, जेवत होते. अमेरिकेने अफगानिस्तानमध्ये सोव्हिएतविरोधात लढण्यासाठी दहशतवाद्यांना प्रॉक्सीसारखे वापरले, असा आरोप ख्वाजा यांनी केला.