काराकस : वृत्तसंस्था
व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये अमेरिकेने ७ हवाई हल्ले केले. पहिला हल्ला स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे २ वाजता झाला. अमेरिकन मीडिया सीबीएस न्यूजच्या मते, ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील लष्करी सुविधांवर आणि अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याचा आदेश दिला होता.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या प्रशासनाविरुद्ध मोठी लष्करी कारवाई यशस्वी केली आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांना व्हेनेझुएलाच्या बाहेर सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. ही कारवाई अमेरिकन लष्कर आणि कायदा अंमलबजावणी संस्थांच्या संयुक्त मोहिमेतून पार पडली.
हल्ल्याच्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये शहरावरून कमी उंचीवरून उडणारीे १० विमाने दिसली. बॉम्बस्फोटानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांतील लोक घाबरून रस्त्यावर आले. व्हेनेझुएला सरकारने या घटनेवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काराकस ही व्हेनेझुएलाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. हे कॅरिबियन समुद्राजवळ, उत्तर व्हेनेझुएलातील कॉर्डिलेरा दे ला कोस्टा पर्वतरांगेत स्थित आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष राजवाडा, संरक्षण मंत्रालय, लष्करी मुख्यालय, गुप्तचर संस्था आणि एक प्रमुख हवाई तळ आहे. काराकसची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक आहे.
भारतीय व्यापाराला धक्का…
भारत व्हेनेझुएलाला औषधनिर्माण, लस, यंत्रसामग्री, कापूस कापड, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स विकतो. व्हेनेझुएलामधून कच्चे तेल, पेट्रोलियम कोक, लोखंडी भंगार, तांबे भंगार आणि काही सेंद्रिय रसायने खरेदी करतो. २०२४ च्या आकडेवारीनुसार, भारताने व्हेनेझुएलामधून अंदाजे ३६.२० दशलक्ष डॉलर्स किमतीचे ॲल्युमिनियम आयात केले. हे ऑटोमोबाईल्स, बांधकाम आणि वीज निर्मितीमध्ये वापरले जाते. व्हेनेझुएलामधून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. भारताची सरकारी तेल कंपनी, ओएनजीसी विदेशने व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. निर्बंधांमुळे ओएनजीसी विदेशची अंदाजे ६०० दशलक्ष डॉलर्स मालमत्ता रोखण्यात आली आहे. हा कंपनीसाठी मोठा धक्का आहे. भारताची औषधी आणि कपड्यांची निर्यातही घटली आहे, ज्यामुळे भारताचा व्यापार धोक्यात आला आहे.

