शस्त्रसंधीसाठी नाही, तणाव निवळण्यासाठी केली मदत
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचलेला असताना ४ दिवसांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या यशस्वी मध्यस्थीमुळे भारत-पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केल्याचा दावा केला होता. पण आता त्यांनी याच वक्तव्यावरून घूमजाव करीत भारत-पाकिस्तानमध्ये मी शस्त्रसंधी घडवून आणली नाही. परंतु तणाव निवळण्यास मदत केली असल्याचे म्हटले आहे.
भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळण्यासाठी आपण मध्यस्थी केली, असे मला म्हणायचे नव्हते. परंतु दोन देशांमध्ये जो तणाव निर्माण झाला होता, तो कमी करण्यासाठी मदत जरूर केली, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. कतारमधील अमेरिकेच्या लष्करी कर्मचा-यांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. या आधी जवळपास पाच वेळा ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा केला होता.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. या दोन देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती होती. या दोन देशांमध्ये अचानक मिसाईल्स हल्ले होऊ लागले आणि आम्ही ते बंद केले. किती वर्षे तुम्ही लढत राहणार, आता लढाई थांबवा, असे म्हणत भारत आणि पाकिस्तानसमोर व्यापाराचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे दोन्ही देशांचे समाधान झाले. दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर असताना या २ देशांत शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. याची पहिली माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली. यावरून भारतात नाराजी पसरल्याचे दिसून आले. त्यानतंरही ४ वेळा ट्रम्प यांनी हाच दावा केला. पण यावरून भारताची नाराजी वाढताना दिसत असल्याने आता त्यांनी घूमजाव केल्याची चर्चा आहे.
भारताने फेटाळला
होता ट्रम्प यांचा दावा
भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा आधीच फेटाळून लावला होता. युद्धविरामात व्यापाराचा कोणताही संदर्भ नव्हता, असे भारतानें स्पष्ट केले होते. युद्धविरामाचा निर्णय दोन्ही देशांमध्ये झाला. यामध्ये तिस-या देशाची भूमिका नाही, असेदेखील भारताने म्हटले होते. आता ट्रम्प यांनीच यासंबंधी कबुली दिली.
भारतात अॅपलच्या आयफोन
निर्मितीला ट्रम्प यांचा विरोध!
भारत-पाक तणावात मध्यस्थी केल्याचा दावा करणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथे एक मोठे वक्तव्य केले. त्यांनी आयफोन तयार करणा-या अॅपल कंपनीला भारतात आयफोन तयार न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी याबाबत अॅपलचे सीईओ टीम कुक यांच्याशी चर्चादेखील केली.