वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारताची कॉपी करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानची अमेरिकेत चांगलीच फजिती झाली. भारताने विविध देशांमध्ये आपल्या खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले. त्यानंतर पाकिस्ताननेही शिष्टमंडळ पाठवले. परंतु अमेरिकेत पाकिस्तानच्या या शिष्टमंडळाला दहशतवादावर चार कठोर बोल ऐकावे लागले.
बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकेतील खासदाराने सांगितले की, तुम्ही दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदचा खात्मा करा. तसेच धार्मिक अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करा. वरिष्ठ खासदार ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानला हा कडक संदेश दिला.
वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाने शेरमन यांची भेट घेतली. त्यावेळी ब्रॅड शेरमन म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादी संघटनेचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली पाहिजेत. त्यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेविरुद्ध निर्णायक कारवाई करावी. वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येसाठी ही संघटना जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिलावल भुट्टो यांनी शिष्टमंडळासह न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि सुरक्षा परिषदेच्या राजदूतांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी आणि भारतासोबतचा संघर्ष सोडवण्यासाठी मदतीची याचना केली. परंतु त्यांना दहशतवाद निपटण्याचा सल्ला देण्यात आला.