29.9 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeउद्योगअमेरिकेने ४ कोटी रुपयांचे भारतीयांचे आंबे नष्ट केले!

अमेरिकेने ४ कोटी रुपयांचे भारतीयांचे आंबे नष्ट केले!

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारतीय आंब्याला जगभरात मोठी मागणी आहे. अमेरिका हा महत्त्वाचा खरेदीदार आहे. पण, अमेरिकेने भारतातून पाठवलेल्या आंब्याच्या तब्बल १५ खेपा परत पाठवल्या आहेत, तर काही नष्ट केल्या आहेत. यामागे रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमधील गोंधळ असल्याचे कारण दिले आहे. अमेरिकेने नाकरलेल्या या आंब्यांची किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.

लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर ही आंब्याची वाहतूक थांबवण्यात आली. अमेरिकन अधिका-यांनी सांगितले की, रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या. फळांमधील कीटकांना मारण्यासाठी आणि ती जास्त काळ ताजी राहावी यासाठी ही प्रक्रिया केली जाते. कागदपत्रांमध्ये गडबड असल्याचे कारण देत अमेरिकन कस्टम अधिका-यांनी हा माल स्वीकारण्यास नकार दिला.

आंबा निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार, खरी समस्या कीटकांची नव्हती, तर त्या कीटकांना मारण्याच्या प्रक्रियेच्या कागदपत्रांची होती. हे आंबे ८ आणि ९ मे रोजी मुंबईत रेडिएशन प्रक्रियेतून गेले होते. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अधिका-याच्या देखरेखेखाली झाली होती. नवी मुंबईतील रेडिएशन सेंटरमध्ये झालेल्या चुकांमुळे त्यांना हे नुकसान सोसावे लागले.

अमेरिकन अधिका-यांनी अमेरिकेतील आंबे नष्ट करण्याचा किंवा त्यांना भारतात परत पाठवण्याचा पर्याय दिला होता. पण आंबा लवकर खराब होणारा असल्याने आणि त्याला परत पाठवण्याचा खर्च खूप जास्त असल्याने, सर्व निर्यातदारांनी ते आंबे नष्ट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना सुमारे ४.२८ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR