23.7 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयअरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार, न्यायालयाने ३ जुलैपर्यंत केली कोठडीत वाढ

अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार, न्यायालयाने ३ जुलैपर्यंत केली कोठडीत वाढ

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाकडून आणखी एक धक्का बसला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिला असून त्यांची न्यायालयीन कोठडी ३ जुलैपर्यंत वाढवली आहे. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यात केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद केला तर अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) एस. व्ही. राजू यांनी बाजू मांडली. सुनावणीनंतर न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिला.

केजरीवाल यांच्यासोबतच दुसरा आरोपी विनोद चौहानच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, कोर्टातील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केजरीवाल यांनाही त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी सांगितले की त्यांचे वकील त्यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करतील.

दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक केली होती. पहिले ११ दिवस ते ईडीच्या कोठडीत राहिले आणि १ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले. १० मे रोजी तुरुंगातून बाहेर येईपर्यंत केजरीवाल ५० दिवस तिहार तुरुंगात बंद होते. जामिनावर असताना केजरीवाल यांनी आपल्या पक्षासाठी जोरदार प्रचार केला आणि २ जून रोजी तुरुंगात आत्मसमर्पण केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR