18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअर्चना पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश

अर्चना पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश

पक्षात प्रवेश करताच लोकसभेचे तिकीट

मुंबई : भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. अर्चना पाटील यांचा आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.

अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी आज पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे.

अर्चना पाटील मोठ्या फरकाने विजयी होतील : तटकरे
महायुतीच्या जागावाटपात धाराशिवची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चना पाटील या आमच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. महायुतीच्या उमेदवाराची एकसंघाने घोषणा ही पहिल्यांदाच होत आहे. याआधी प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले.

पण धाराशिवच्या बाबतीत एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. त्या मतदारसंघाचे भाजपचे आमदार, शिवसेनेचे आमदार, राष्ट्रवादीचे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा करणार आहेत. धाराशिवमध्ये अर्चना पाटील मोठ्या फरकाने विजयी होतील’’, असं सुनील तटकरे म्हणाले.

अर्चना पाटील यांची राजकीय कारकीर्द
अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आहेत. लेडीज क्लब या धाराशिव जिल्हा आणि परिसरातील महिलांसाठी काम करणा-या संघटनेच्या त्या अध्यक्ष आहेत. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

२०१२ : समाजकार्यातून राजकारणात पदार्पण. धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव जिल्हा परिषद गटातून विक्रमी मतांनी विजयी.

२०१७ : धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटातून विजयी. याच कार्यकाळात जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य सभापतीपदाचा पदभार सांभाळत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक उपकेंद्राचे जिल्हाभरात जाळे निर्माण केले.

अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांचे मानधन वाढीसाठी विशेष प्रयत्न प्रलंबित प्रश्न मार्गी लावला.
जिल्हा परीषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा दुरुस्ती नवीन वर्गखोल्या, संरक्षण भिंती बांधणे आदी कामे करून जि.प.शाळांचे रुपडे पालटले.

सामाजिक कार्य:
लेडीज क्लबच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
पुण्यातील भीमथडी किंवा मुंबईतील महालक्ष्मी सारख्या मोठ्या महोत्सवांसारखाच प्लॅटफॉर्म धाराशिव जिल्ह्यातील महिलांना मिळावा म्हणुन हिरकणी महोत्सवासारखी संकल्पना जिल्ह्यात आणली. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील बचत गटातील महिला उद्योजक या महोत्सवात दरवर्षी सहभागी होतात आणि लाखोंची उलाढाल करतात.

तेरणा ट्रस्ट :
तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे मोफत रोगनिदान
शेकडो नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रिया
आरोग्य शिबिरांमध्ये मोफत साहित्य वाटप : हजारो रुग्णांना थेट लाभ
रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन : शेकडो नागरिकांना थेट लाभ.
जन्म तारीख: २९/०७/१९७१
शिक्षण: अभियांत्रिकी (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स, पुणे विद्यापीठ)

कौटुंबिक माहिती:
सासरे: डॉ. पद्मसिंह बाजीराव पाटील
पती: राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
अपत्ये: मल्हार पाटील, मेघ पाटील
आजोळ: स्व.उत्तमराव पाटील (भाजप)
मा. दौलतराव आहेर (चुलते)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR