नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१ फेब्रुवारी २०२५ ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. या आगामी अर्थसंकल्पाची तयारीही सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षांसह सूचना आणि प्रस्तावांबद्दल माहिती जाणून घेतली. दरम्यान, या अर्थसंकल्पात शेतक-यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निर्मला सीताराम यांनी आज घेतलेल्या प्रदीर्घ बैठकीत शेतक-यांच्या हिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. २ तास चाललेल्या बैठकीत, शेतक-यांच्या हिताशी संबंधित समस्या आणि आव्हानांवर विस्तृत चर्चा केली. भारत कृषक समाजाचे अध्यक्ष अजय वीर जाखड यांनी कृषी उत्पादकता अधिक महत्त्वाची बनविण्याबरोबरच शेतक-यांचे हित वाढवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधी दुप्पट म्हणजे १२,००० होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. हा निर्णय झाल्यास शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे.
प्रमुख मागण्या काय?
– पीएम-किसान सन्मान निधीची रक्कम १२,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, जी यापूर्वीही करण्यात आली होती.
– लहान शेतक-यांना शून्य प्रिमियमवर पीक विमा काढण्याची सुविधा मिळावी.
– शेतकरी कर्जाचे व्याजदर एक टक्क्यावर आणण्याची शिफारस करण्यात आली.
– शेतीमध्ये वापरण्यात येणारी उपकरणे किंवा यंत्रे, खते किंवा बियाणे आणि औषधे यांना जीएसटीमधून सूट देण्याची देण्यात यावी.
– हरभरा, सोयाबीन आणि मोहरी या विशेष पिकांवर लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून शेतक-यांना या विशेष पिकांसाठी अधिक पैसे मिळू शकतात.