25.1 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रअलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल

अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल

अलिबाग : अलिबागचा बहुप्रतीक्षित पांढरा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा पांढरा कांदा नेहमीपेक्षा उशिराने दाखल झाला आहे. हंगामाची सुरुवात असल्याने पुढील काही दिवस कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली आहे. कांद्याची माळ २५० ते ३०० रुपयांना विकली जाण्याची अपेक्षा शेतक-यांना आहे.

रुचकर चव आणि औषधी गुणधर्म यामुळे अलिबागच्या पांढ-या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. साधारण जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात हा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने हा कांदा भाव खाऊन जात असतो. यंदाही अडीचशेहून अधिक हेक्टर क्षेत्रावर या कांद्याची लागवड करण्यात आली असून कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

अलिबाग तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये प्रामुख्याने या कांद्याची लागवड केली जाते. भात कापणीनंतर साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात शेतकरी सेंद्रीय पध्दतीने या कांद्याची लागवड करतात. नव्वद दिवसांत कांदा काढणीसाठी तयार होत असतो. सध्या कांद्याच्या काढणीचे काम वेगात सुरू झाले असून, वाळलेल्­या कांद्याच्­या वेण्­या बनवण्­याचे काम सुरू झाले आहे. यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्­ध होत आहे. व्­यापारी शेतक-यांच्­या बांधावर येऊन कांद्याची उचल करीत आहेत आणि नवीन कांद्याला चांगला भावदेखील मिळतो आहे.

या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढ-या कांद्याची लागवड केली जाऊ लागली. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने पाणी मुबलक होते. पांढ-या कांद्याचा आकार मोठा असेल. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे.

पांढ-या कांद्याचे औषधी गुणधर्म
अभ्यासकांच्या माहितीनुसार या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अ‍ॅसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. याच औषधी गुणधर्म आणि चवीमुळे या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR