सोलापूर / प्रतिनिधी
दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन दोरीने डोळ्यावर, चेहऱ्यावर, पाठीवर मारहाण करुन जखमी करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पिडीतेच्या मामीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून बसप्पा रंगप्पा शेंडगे याच्याविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पिडिताचे वडील मयत झाल्याने ती गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मामा-मामीकडे राहते. ती सध्या दहाव्या इयत्तेत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून एक मुलगा तिचा पाठलाग करीत होता. याबाबत तिने आपल्या मामीला सांगितले होते. मात्र त्याचे नाव, पत्ता माहित नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
शाळेत दहावीचे सराव पेपर असल्याने ती शाळेला निघाली होती. सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्यान वरील आरोपीने तिची सायकल अडवून दोरीने तिला मारहाण सुरु केली. याबाबत पिडितेच्या मामीला एकाच्या फोनवरुन माहिती मिळाली. दरम्यान, पिडितेला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.