25.8 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeलातूरअल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

लातूर : प्रतिनिधी
रविवार रोजी लातूरात अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रसंगी लग्न मंडपात पोलीस दाखल होऊन मुलगा, दोन्ही बाजूचे नातेवाईक, लग्नविधी करणारा, फोटोग्राफर, स्वयंपाकी व व-हाडी मंडळी यांचे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हेल्पलाइन ११२ वरून खाडगाव रोड लातूर परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह घडवून येत असले बाबतची माहिती दिनांक ३० जून रोजी पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी लागलीच चाईल्ड लाईनचे पदाधिकारी यांना याबाबत अवगत करून पोलीस ताफ्यासह विवाह मंडपात दाखल झाले. पोलीस लग्न मंडपात दाखल झाल्याचे पाहताच व-हाडी मंडळी लग्न मंडपातून भीतीने पसार झाले. पोलिसांनी विवाहातील मुला मुलींचे नातेवाईक यांचे कडे अधिक चौकशी केली असता वधू ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वधूवरांसह त्यांचे नातेवाईकांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले.

चाइल्ड लाईनच्या अलका संमुखराव यांचे तक्रारीवरून नवरी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील विवाह लावून दिल्यामुळे नवरदेव, दोन्ही बाजूंचे नातेवाईक, लग्न जमवणारे, वधू वराचे मामा, ब्राह्मण, फोटोग्राफर, स्वयंपाकी व १५० ते २०० व-हाडी मंडळी यांचे विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वये शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक लटपटे, पोलीस अंमलदार चौगुले, कोतवाड, कांबळे, शेख, भरोसा सेल, दामिनी पथकाच्या अंमलदार पल्लवी चिलगर आणि चाईल्ड लाईनच्या सुपरवायझर अलका संमुखराव यांच्या पथकाने केली. अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह लावून देण्यात येत असल्यास त्याबाबत तात्काळ पोलिसांना व चाईल्ड लाईनला कळविणेबाबत लातूर पोलिसांकडून आव्हान करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR