परभणीत वीज पडून २ मृत्युमुखी, जनावरेही दगावली
परभणी/लातूर/बीड : प्रतिनिधी
मराठवाड्यातील ब-याच भागात गेल्या ३ दिवसांपासून कुठे ना कुठे वादळी वा-यासह अवकाळी पाऊस पडत आहे. गुरुवारी दुपारनंतर परभणी, लातूर, बीडसह हिंगोली, नांदेड आदी भागात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात तर अवकाळी पावसादरम्यान वीज पडून दोघांचा बळी गेला तर एक बैल आणि शेळीही दगावली. लातूर शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला. औसा तालुक्यात तर वादळी वा-यासह गारपीट झाल्याने उन्हाळी पिके, फळझाडांची हानी झाली. बीड जिल्ह्यातही गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात आज वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्यातील ईळेगाव येथील शेतकरी बाबू शेळके आणि सोनपेठ तालुक्यात शेळगाव येथे एका ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. यासोबतच एक बैल व खपाट पिंपरी येथे शेळीचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गंगाखेड तालुक्यातील ईळेगाव येथील शेतकरी बापू नरेंद्र शेळके (६०) मशागतीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्यावेळी अचानक अवकाळी पाऊस झाला. त्यावेळी वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील मेंढ्या राखणारी हरीबाई एकनाथ सुरनर यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना भाऊचा तांडा येथे घडली. तसेच शेळगाव येथील गिरीष हालगे यांच्या आखाड्यावर वीज पडून एक बैल तर खपाट पिंपरी येथे किशोर खंदारे यांची शेळी मृत्यू पावली.
यासोबतच बीड जिल्ह्यातही अवकाळीचा तडाखा बसला असून, गारपिटीने पिकांची हानी झाली आहे. दुपारनंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातही गुरुवारी दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागांत अवकाळीने हजेरी लावली.
शिरुर अनंतपाळ
तालुक्यात बैल दगावला
लातूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा बसला. जळकोट तालुक्यात वादळी वा-यासह झालेल्या पावसादरम्यान झाडावर वीज कोसळली, तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात वीज पडून बैल दगावला. तसेच औसा तालुक्यात हिप्परगा, बेलकुंड परिसरात अचानक वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे आंब्यासह फळझाडे आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले.
विदर्भालाही मोठा फटका
विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, अनेक ठिकाणी फळबागा, रबी पिके आणि भाजीपालावर्गीय पिके आडवी झाली आहेत. गारपिटीत टरबूज, डांगर यासह फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांची हानी झाली. तसेच पत्रे उडून घरांचेही नुकसान झाले आहे.