छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील शेतक-यांसमोर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. ऐन उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील तीन-चार दिवसांमध्ये झालेल्या पावसाने विभागातील ५३ गावांमधील ८७१ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या जमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी नुकसानभरपाईसाठी किती वाट पाहावी लागेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर वीज पडून हानी होण्याच्या देखील अनेक घटना घडल्या असून त्यात बीड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर १५ जनावरं दगावली आहेत.
मराठवाड्यात गेल्या तीन ते चार दिवसांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे ५३ गावांतील १ हजार ५९४ शेतक-यांच्या ८७१ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४, परभणीत १, बीडमधील १, लातूर ३७ अशा ५३ गावांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ६८८ हेक्टर, परभणीतील ३.२, बीडमधील ०.९० हेक्टर, तर लातूरमधील १७८, अशा ८७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात जिरायत २२७.६ हेक्टर, तर बागायत ५६६.६ आणि ७७.५ हेक्टरवरील फळपिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसला.
मराठवाड्यात पावसामुळे होणारे नुकसान देखील अधिक आहे. बीडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर पावसामुळे दुधाळ, ओढकाम करणारी लहान-मोठी मिळून १५ जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक ५ जनावरे परभणी जिल्ह्यात दगावली आहेत. छत्रपती संभाजीनगर ३, बीड जिल्ह्यात ३, हिंगोली २, लातूर २ जनावरं दगावली आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २, परभणी जिल्ह्यात ३ आणि बीड जिल्ह्यात एका घराची पडझड झाली आहे.